मुंबई: आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण कोणत्याही विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लवकरच खाते वाटप
नवं सरकार आल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन संपले आहे. विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्ष निवड, विरोधी पक्षनेता निवड आदी सोपस्कार पार पडले आहेत. त्यामुळे आता सरकार अधिक वेगाने काम करणार असल्याची माहिती उद्धव यांनी दिली. आगामी एक-दोन दिवसात खाते वाटप करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या मंत्रिमंडळातील आम्ही सातही मंत्री एकत्र काम करत असून निर्णय त्वरीत घेतले जात असल्याची माहिती उद्धव यांनी दिली.