उन्नाव : हैदराबामधील महिला डॉक्टरला बलात्कारानंतर जाळून मारल्याची घटनेला काही दिवसच लोटले असताना उन्नावमध्ये एका सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण उन्नाव हादरले आहे. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे
.पीडिता आज (गुरुवारी) पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा हे आरोपी जामिनावर सुटले आहेत.