वेब टीम
मुंबई
अभिनेत्री जान्हवी कपूरला एकाच चित्रपटाचा अनुभव असला, तरी तिच्या हाती उत्तमोत्तम चित्रपट आहेत. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता, आपण आई श्रीदेवी यांनी दिलेल्या शिकवणीवरच प्रत्येक निर्णय घेत असल्याचं तिनं लाइव्ह गप्पांमध्ये सांगितलं. सध्याच्या काळात अभिनेत्रींसाठीही ‘लेडी कबीर सिंग’ प्रकारच्या भूमिका लिहिल्या जाव्यात, असं तिला वाटतं.
‘धडक’ ही केवळ सुरुवात आहे. मी चांगलं काम केलं की नाही हे सांगायला खूप लोक आहेत. मात्र माझा प्रवास हा आईच्या शिकवणीवरच सुरू आहे, असं जान्हवी कपूर सांगते. ‘तिला जितकी उत्तम अभिनेत्री व्हायचं आहे, त्यासाठी आधी तितकंच उत्तम व्यक्ती व्हावं लागेल,’ असा सल्ला आईनं दिल्याचं ती म्हणते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला जाहीर कार्यक्रमांमध्ये सातत्यानं आईशी असणाऱ्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. मात्र, एरवी फारसं न बोलणाऱ्या जान्हवीनं आईशी असणारं नातं आणि तिची शिकवण यावर या गप्पांमध्ये सविस्तर भाष्य केलं.