मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपलं 'संकल्पपत्र' जाहीर केलंय. यात अनेक घोषणांशिवाय एका घोषणेची मोठीच चर्चा सुरू झालीये. ती म्हणजे- महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याविषयी पाठपुरावा करण्याचं आश्वासन. मात्र, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी निवडणुकीच्या तोंडावर अशी घोषणा करण्याच्या भाजपच्या 'टायमिंग'वर बोट ठेवलंय.
२०१४पासून भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात असताना अनेकांना 'भारतरत्न' प्रदान करण्यात आले. त्याचवेळी, सावरकरांनाही 'भारतरत्न' देता आले असते. त्यामुळे, आता निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनाम्यात निवडून आल्यास सावरकरांना 'भारतरत्न' देऊ, असं काही म्हणण्याची गरज नव्हती. असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी (भाजप) अनेकांना दिला तसाच सावरकरांनाही 'भारतरत्न' देता आला असता. "...त्यामुळे हिंदुत्ववादी, सावरकरवादी मतांचा गठ्ठा मिळवण्यासाठी हे कुठेतरी आहे की काय, अशी शंका येते", अशी खरमरीत टीकाही पोंक्षे यांनी केली. मात्र, तरीही भाजपला सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची बुद्धी झाली, याबद्दल सावरकरप्रेमी म्हणून आभारी आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. गेल्या खेपेस केंद्रात व राज्यात सत्ता असूनही भाजपकडून या मागणीची पूर्तता झाली नव्हती. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपनं या मागणीला स्थान दिलं आहे.