रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आज १३ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, गुमला जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस उपायुक्त शशी रंजन म्हणाले की हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नसून मतदान अजूनही सुरू असल्याची माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे.
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७,८३, ०५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा असल्याचे मानले जात आहे. या मुळे अशा बर्याच उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
भाजप आणि विरोधी पक्ष या दोघांसाठी निवडणूक महत्त्वाची
ही निवडणूक भाजप आणि विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप जोरदार दबाव आणत असताना, रघुबर सरकारला मात देण्यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये झारखंडचे आरोग्यमंत्री रामचंद्र चंद्रवंशी, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरावण आणि माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भानु प्रताप शाही आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रघुबर दास म्हणाले, तुमचे प्रत्येक मत राज्याच्या विकासासाठी अत्यंत मोलाचे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री रघुबर यांनी लोकांना मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने येऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पहिल्या टप्प्यात या जागांसाठी मतदान
पहिल्या टप्प्यात या जागांवर मतदान
या टप्प्यात एकूण १८९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांपैकी १७४ पुरुष आणि १५ महिला उमेदवार आहेत. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार आहे. चत्रा, बिशुनपूर, लातेहार, गुमला, लोहरदगा, पनकी, माणिका, विश्रामपूर, हुसेनाबाद, डाल्टनगंज, छतरपूर, भवनाथपूर, गढवा या जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे.