नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोफत वायफाय इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. 16 डिसेंबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. आप (आम आदमी पार्टी) ने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत मोफत इंटरनेटचे आश्वासन दिले होते. त्याचीच ही पूर्तता केली जात आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, की 'इंटरनेट आता सामान्यांची मूलभूत गरज बनले आहे. त्यामुळेच मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याबरोबरच, आम आदमी पक्षाने निवडणुकीत दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण होतील.'
प्रत्येक अर्ध्या किमीवर एक हॉटस्पॉट
सीएम केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबरपासून योजनेची सुरुवात केली जात आहे. यात सुरुवातीला दिल्लीत 100 वायफाय हॉटस्पॉट सुरू केले जातील. त्यांची संख्या नंतर एकूणच 11 हजार केली जाईल. त्यातील 4 हजार बस स्टॉपवर आणि उर्वरीत 7 हजार हॉटस्पॉट संपूर्ण दिल्लीत लावले जातील. योजनेत पहिल्याच आठवड्यात 100 हॉटस्पॉट सुरू होतील आणि दर आठवड्याला 500 नवीन हॉटस्पॉट जोडले जातील. दिल्लीत प्रत्येक अर्ध्या किमी अंतरावर एक हॉटस्पॉट मिळेल.
प्रत्येकाला 15 जीबी मासिक डेटा
दिल्ली सरकारच्या या स्कीममध्ये प्रत्येकाला दर आठवड्याला 15 जीबी वायफाय इंटरनेट डेटा मिळणार आहे. यातील 1.5 जीबी ते रोज वापरू शकतील. वायफायची स्पीड कमाल 200mbps आणि किमान 100mbps राहील. एक हॉटस्पॉटचा 100 जण वापर करू शकतील. यासाठी एक अॅप बनवले जात आहे. ते लवकरच जारी केले जाईल. हॉटस्पॉटशी कनेक्ट होण्यासाठी आपला KYC द्वाया लागेल. यानंतर एक वन टाइम पासवर्ड येईल. त्यावरूनच वायफाय कनेक्ट करता येईल. एकदा कनेक्ट केल्यानंतर दुसऱ्या वायफाय हॉटस्पॉटच्या रेंजमध्ये गेल्यानंतर पुन्हा-पुन्हा ओटीपी टाकावा लागणार नाही.