नवी दिल्ली : हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार आणि जळितकांड प्रकरणी देशभर आक्रोष व्यक्त केला जात आहे. परंतु, याच दरम्यान पीडितेचे नाव आणि ओळख माध्यमांमध्ये जाहीर करण्यात आली. याच प्रकरणाची दिल्ली हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. हायकोर्टाने बुधवारी यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. दिल्ली हायकोर्टाचे सरन्यायाधीश डीएन पटेल आणि जस्टिस सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केवळ केंद्रालाच नव्हे, तर तेलंगणा राज्य सरकार, आंध्र प्रदेश सरकार आणि दिल्लीसह काही बड्या माध्यम समूहांना नोटीसा बजावल्या आहेत.
आरोप सिद्ध झाल्यास 2 वर्षांपर्यंतची कैद
बलात्कार पीडितेचे नाव आणि ओळख जाहीर करता येत नाही. तरीही काही बड्या माध्यम समूहांनी आपल्या वृत्तांमध्ये हैदराबाद बलात्कार पीडितेचे नाव, फोटो आणि ओळख जाहीर केली. त्याविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 16 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 228 (अ) नुसार, बलात्कार आणि काही ठराविक प्रकरणांमध्ये पीडितांची नावे जाहीर करणे हा गुन्हा आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास 2 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड ठोठावला जाऊ शकतो.
दिल्लीतील वकील यशदीप चहल यांनी ही याचिका दाखल केली होती. बलात्कार पीडितेचे नाव जाहीर करणे हा गुन्हा आहे. सुप्रीम कोर्टाने देखील विविध प्रसंगी हेच निरीक्षण नोंदवले होते. तरीही अनेक माध्यमांनी आणि सामान्य लोकांनी हैदराबाद बलात्कार पीडितेचे नाव आणि ओळख जाहीर केली. ऑनलाइन आणि ऑफलाइन मीडियामध्ये तिचे नाव प्रसिद्ध करून कलम 228 (अ) चे उल्लंघन करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांनी ही याचिका अॅडव्होकेट चिराग मदान आणि साई कृष्ण कुमार यांच्या हस्ते दाखल केली. त्यांच्या मते, कित्येक ऑफलाइन आणि ऑनलाइन मीडियावर पीडितेचे नाव जाहीर होत असताना पोलिस, सरकार आणि प्रशासनाने ते थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही.
27 नोव्हेंबर 2019 रोजी 26 वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शमशाबाद येथे तिला जाळण्यात आले. सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 4 आरोपींनी सुरुवातीला तिच्या स्कूटरचे मागचे चाक पंक्चर केले होते. यानंतर मदत करण्याचे ढोंग करून तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या दरम्यान पीडितेचा गुदमरून मृत्यू झाला आणि नराधमांनी तिचा मृतदेह त्याच ठिकाणी जाळला. सध्या चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.