मुंबई : दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. कारण नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.
फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी हा निर्णय मर्यादित होता. पण महाराष्ट्र शासनानं बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात, असं शासनाने म्हटलं आहे. अनुत्तीर्ण झालेल्या तरणामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत दोन विषयांत नापास असेल तर गुणपत्रिकेवर एटीकेटी हा शेरा दिला जायचा. तर तीन विषय किंवा त्याहून जास्त विषयात नापास असणाऱ्यांसाठी नापास हा शेरा होता.