मुंबई : जर तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत शीख नरसंहार झाला नसता, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
इंद्रकुमार गुजराल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते. यावेळी बोलताना मनमोहन सिंग यांनी 1984च्या शीख दंगलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
शीख दंगलीवेळी पी. व्ही. नरसिंह राव यांना सांगितलं होतं की परिस्थिती गंभीर असून सरकारला लवकरात लवकर लष्कराला बोलावणं गरजेचं आहे. जर पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकून आवश्यक कारवाई केली असती तर कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन शीख अंगरक्षकांकडून हत्या झाल्यानंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 3,000 शिखांचा मृत्यू झाला होता.