नवी दिल्ली |- गल्ली ते दिल्ली सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीचीच चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडताना दिसतात. सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात, असं प्रत्युत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं.
मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, कारण प्रत्येक भारतीयाची भूक भागवली जाते. पण कांद्याचं उत्पादन का घटलं? मला इजिप्शियन कांदा खाण्यात अजिबात रस नाही. भारतीयांनी असं का करावं?, असा प्रश्न सुप्रियी सुळेंनी विचारला.
सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री निर्मला सीतारमन उठल्या, तेव्हा एका खासदारानं, तुम्ही कांदा खाता का?, असा प्रश्न विचारला. त्यावर मी इतका लसूण, कांदा खात नाही हो, काळजी करु नका, मी अशा कुटूंबातील आहे, जिथे कांदा लसूण यांना फारसं महत्त्व नाही, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत. सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता.