मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर राहायला जातील, अशी शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या पत्नी रश्मी ‘वर्षा’ची पाहणी करणार आहेत.
आपल्या घरात आपल्या आवडी-निवडी जपल्या जाव्यात, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मग जर मुख्यमंत्री वर्षावर रहायला जाणार असतील तर त्यांच्या आवडीनुसार वर्षा बंगला सजवायला हवा. त्यासाठी रश्मी ठाकरे वर्षाच्या सजावटीत जातीनं लक्ष देणार असल्याचं दिसतंय. बंगल्यातल्या वस्तूंची ठेवणं कशी असावी, याबाबतही रश्मी तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना सूचना देतील.
मातोश्री हे शिवसेनेचं प्रेरणास्थान आणि ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर राहणार की वर्षावर हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यावर मातोश्रीशी आमचं भावनिक नातं आहे. मात्र मुख्यमंत्री या जबाबदारीच्या पदावर बसल्यावर सरकारी कामं ही वर्षावरून चालतील, असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्षा बंगला सोडणार आहेत. आणि येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्याचा ताबा मिळेल.